चंद्रपूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी केंद्रामधून (Common Service Centre) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामजंस्य करार महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्ययस्थापकीय संचालक, विजयसिंह देशमुख व सीएससी केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
या करारानुसार, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील, यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
सीएससी केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सीएससी केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल.राज्यामध्ये सीएससी चे 72 हजारपेक्षा जास्त केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र, कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी, बैंकचा हप्ता , अपलोड करण्यासाठी प्रत्येकी 70 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही. तसेच महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकलणाऱ्या अनधिकृत एजंट लोकांना आळा घालणे शक्य होईल. भविष्यात लाभार्थ्यांसाठी महामंडळाचे मोबाईल अॅप व चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव