पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)।समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, “रोड हिप्नोसिस” (रोड संमोहन) ही अवस्था अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. ही अवस्था टाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे. या उपक्रमांतर्गत चालकांना प्रशिक्षण देणे, अपघात प्रवण क्षेत्रांवर दिशादर्शक लावणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण करणे, तसेच चालकांना मार्गदर्शन करणे या उपाययोजना करण्यात येत आहेत. या माध्यमातून कंपनीने राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात मोलाचे योगदान दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी मंत्री सरनाईक यांनी मर्सिडीज कंपनीच्या प्रतिनिधींशी राज्याच्या ई-वाहन धोरणाबाबत चर्चा केली. भविष्यात कंपनीने ई-वाहन क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु