सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत कॅन्सर निदान वॅनचा पंढरपूर तालुक्यात आगमन होत असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्वरित तपासणी व उपचाराची सुविधा मिळत आहे. दिनांक ११ रोजी भाळवणी, १२ रोजी उपरी, १३ रोजी भंडीशेगाव आणि आज १४ रोजी वाखरी येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
वाखरी येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. एकनाथ बोधले (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. भिसे, डॉ. स्वाती बोधले, डॉ. महेश माने (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ), डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. खुपसुंगीकर मॅडम (दंत शल्य चिकित्सक), ग्रामपंचायत पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र गा दे गाव व भाळवणीचे अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष लाभार्थी उपस्थित होते. या 4 गावांमध्ये आतापर्यंत ६०० हून अधिक लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, मुख कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग व स्तन कर्करोगाच्या संशयित रुग्णांची पुढील तपासणी उपजिल्हा व सामान्य रुग्णालयांमार्फत केली जाणार आहे. अंतिम निदानानंतर उपचाराचे नियोजन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.स्वस्थ नारी – सशक्त परिवार उपक्रमांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. निदान वॅनमध्ये रक्तदाब, मधुमेह, रक्त व लघवी तपासणीसह आवश्यक सर्व वैद्यकीय तपासण्या उपलब्ध आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड