नाशिक, 15 सप्टेंबर (हिं.स.) - जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर किम्स मानवता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने आज इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर भव्य वॉकथॉन आणि एट्रियल फिब्रिलेशन जनजागृती अभियानाचे आयोजन केले.
'निरोगी हृदय -निरोगी जीवन' हा संदेश देण्यासाठी नागरिक, डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निखिल पटेल आणि डॉ. अतुल पाटील, तसेच माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी डॉक्टरांनी हृदयविकारांपासून बचाव कसा करावा, यावर मार्गदर्शन केले. त्यांनी एट्रियल फिब्रिलेशन या आजाराबद्दल विशेष माहिती दिली. एट्रियल फिब्रिलेशन म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित होणे, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. नियमित तपासणी, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैलीने हा आजार नियंत्रणात ठेवता येतो, असे त्यांनी सांगितले. वॉकथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी हॉस्पिटलने मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले होते. हा महिना एट्रियल फिब्रिलेशन जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV