कोल्हापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील मेसमध्ये विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. या संदर्भात शाहू सेनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन चर्चा केली; मात्र सुधारणा न झाल्यामुळे अखेर विद्यार्थ्यांसह विद्यापीठाच्या आवारात झुणका भाकर आंदोलन केले.
मेसमध्ये विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. जेवणामध्ये साबणाचे तुकडे, घासण्याचे तुकडे, किडे, आळ्या आढळणे ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा हा प्रकार असूनही विद्यापीठ प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
रविवारी संध्याकाळच्या जेवणात विद्यार्थ्यांना संपूर्ण जेवण न देता केवळ वरण-भात देण्यात येते, याच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांनी झुणका भाकर खाऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला.
विद्यापीठ प्रशासनाने सर्व वस्तीगृहांमध्ये मेसचे जेवण बंधनकारक करण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. मात्र जेवणाचा दर्जा, स्वच्छता आणि सकस आहार याबाबत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची दिसून येते.
शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पायदळी तुडवले जात आहे. चपाती, भाजी, भात, आमटी सर्वच जेवण दर्जाहीन असून सर्वाधिक दर वसूल करून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. तक्रारी केल्यास प्रशासन गप्प बसते. त्यामुळे प्रशासनाच्या हेतूवरच शंका उपस्थित होते.आज विद्यापीठासमोर जेवण केले, ४ दिवसात निर्णय न झाल्यास कुलगुरू कार्यालयात झुणका भाकर आंदोलन करण्यात येईल.”
मेसचे मासिक बिल विद्यार्थ्यांकडून महिन्यापूर्वीच वसूल केले जाते.
प्रवेश घेताना डिपॉझिटच्या नावाखाली एक महिन्याचे आगाऊ बिल वसूल केले जाते.मेसला गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांवर मनमानी दंड लावला जातो.
या सर्व गोष्टींमुळे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करत असल्याचा गंभीर आरोप शाहू सेनेने केला आहे.
आज तंत्रज्ञान विभागाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी झुणका भाकर आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, करण कवठेकर, अजय शिंगे, विवेक पोर्लेकर, अभिषेक परकाळे, सिद्धांत गणगे, हर्षवर्धन पाटील, ओमकार कुंभार, शुभम जाधव, कुणाल पांढरे, ऋतुराज पाटील, सूरज पाटील, ओंकार येवले, विश्वास गोरे यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar