मोहनदास करमचंद गांधी यांची राजनीती आजही आमच्या रक्तात भिनलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज वाट चुकलेला देशभक्त म्हणून मोहनदास करमचंद गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्षात्रतेजाचा, राष्ट्रनिष्ठेचा अपमान केला. तोच वारसा क्रिकेट प्रेमी सध्या चालवत आहेत.
इतिहासाची पाने चाळली की लक्षात येते लोकमान्य टिळकांच्या नंतर देशाचे नेतृत्व मोहनदास करमचंद गांधी यांच्याकडे गेले. लोकमान्य टिळकांनी देश स्वातंत्र्याला अग्रस्थानी ठेवून इतर गोष्टींना दुय्यम ठरवले होते. मोहनदास करमचंद गांधी यांनी हिंदू मुसलमान ऐक्य हिंदू मुसलमान संघटन याला प्राधान्य देऊन देश स्वातंत्र्याला दुय्यम स्थान दिले. क्रिकेट प्रेमींनी गांधीजींचा वारसा चालवला. असे म्हटल्यास कोणाला राग येण्याचे कारण नाही.
पाकिस्तान हा असा देश आहे, ज्याने सातत्याने आपल्या देशात रक्तपात घडवला आहे. आपल्या देशाची अतोनात हानी केली आहे. पाकिस्तानच्या क्रौर्याला कोणतीही सीमा राहिलेली नाही. मानवता, सज्जनता या आणि अशा मूल्यांना पाकिस्तानच्या लेखी कवडीची किंमत नाही.
पाकिस्तानशी युद्ध जेव्हा जेव्हा झाले तेव्हा तेव्हा त्यांनी युद्धाचे कोणतेही नियम पाळलेले नाहीत. याचे अनेक दाखले आपल्याला देता येतात. वानगी दाखल एकच उदाहरण देतो.. सौरभ कालिया आणि त्यांचे सहकारी यांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडले. त्यांचा अतोनात छळ केला. त्यांच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिले. त्यांची जननेंद्रिय छाटून त्यांचे मृतदेह हिंदुस्थानच्या हवाली केले. पाकिस्तानच्या या राक्षसी प्रवृत्तीकडे डोळे झाक करून जेव्हा त्यांच्याबरोबर क्रिकेटचे सामने आम्ही खेळतो त्या त्या वेळी आपण आपल्या शूरवीर सैनिकांचा अपमान करतो. त्यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाला कस्पटासमान लेखतो. भारतमातेचा अपमान करतो. देशासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले अशा क्रांतिकारकांचाही अपमान करतो. त्यांच्या त्यागाला, बलिदानाला काडीचीही आपण किंमत देत नाही. एवढे आपले क्रिकेट प्रेम आंधळे झालेले आहे.
१९७१ च्या पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात आपल्या वीर सैनिकांनी पाकिस्तानचे ९३ सहस्र सैनिक पकडले. या युद्धात आपल्या पंचावन्न सैनिकांना पाकिस्तानने पकडले. आपण कोणतीही अट न घालता पाकिस्तानचे पकडलेले सर्व ९३ सहस्त्र सैनिक सोडून दिले. त्याचे सौजन्य म्हणून पाकिस्तानने त्यांच्याकडे असलेले हिंदुस्थानचे पंचावन्न सैनिक आजच्या क्षणापर्यंत परत हिंदुस्थानात पाठवले नाहीत. इतक्या वर्षानंतर ते जिवंत आहेत की त्यांना हाल हाल करून मारले, या संबंधातले कोणतेही वृत्त आपल्यापर्यंत आताच्या क्षणापर्यंत पोहोचले नाही. याविषयी आपल्याला कोणत्याही प्रकारची खंत वाटत नसेल, दुःख होत नसेल आणि पाकिस्तानच्या विषयी मनात चीड निर्माण होत नसेल तर आपल्या शरीरातून आपल्या वीर सैनिकांचे, क्रांतिकारकांचे सळसळणारे रक्त वाहते किंवा नाही याचा शोध ज्याचा त्याने घ्यावा. आपली क्रिकेट भक्ती, आपले क्रिकेट प्रेम हे राष्ट्रभक्ती पेक्षा वरचढ ठरत आहे का त्याचाही शोध घ्यावा.
क्रिकेट प्रेमींना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे नियम पाळण्याचा मोह होतो. त्या मोहा पायी राष्ट्रहिताला बाधक ठरणारा कोणताही नियम कोणताही कायदा आम्ही मातीत गाडून टाकण्याचा बाणेदारपणा आपल्यात राहिला नाही. ही गोष्ट आपल्या सहज लक्षात येईल.
आमच्या राष्ट्राशी शत्रुत्व करणाऱ्या कोणत्याही देशाशी कोणत्याही प्रकारचा संबंध आम्हाला ठेवायचा नाही. असा राष्ट्रीय बाणा दाखवण्याचे धाडस आपल्यात नसेल तर आपण आपल्या स्वातंत्र्याचे, राष्ट्रनिष्ठेचे बलिदान देऊन आपल्या थोर परंपरेचा सत्यानाश करण्यासाठी आपण सिद्ध आहोत असा संदेश आपण देत आहोत याचे भानही राहत नाही.
राष्ट्रहिताला घातक ठरणाऱ्या सर्व अटी ज्या डोनाल्ड ट्रम्प ने घातल्या त्यांना झुगारून देण्याचे धाडस आपल्या पंतप्रधानांनी दाखवले. माझे उदाहरण आपल्यासमोर असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. आणि क्रिकेट खेळाचा आंतरराष्ट्री नियम काटेकोरपणे पाळत असल्याचा अभिमान बाळगत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला विरोध करणारी मानसिकता आपल्या देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे अनेक पाकिस्तान प्रेमी रहात आहेत. त्यांना आपल्या देशाचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करायचे आहे. त्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. या सर्वांना पाकिस्तानची साथ आहे. हे जग जाहीर आहे. तरीसुद्धा पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा सामना खेळला गेलाच पाहिजे अशी आत्मघात की वृत्ती आपण कशासाठी जोपासतो आहोत? असा प्रश्न आपल्या मनात उपस्थित होत नसेल तर आपल्या सर्व संवेदना गोठून गेल्या आहे असे समजावे.
२४ एप्रिल २०२५ या दिवशी पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांनी धर्म विचारून आपल्या बांधवांची हत्या केली. हे ताजे उदाहरण, हा ताजा अनुभव असताना आपण राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती याकडे पाठ फिरवून क्रिकेटचा सामना पाहण्याचा आनंद लुटणार असलो तर आपल्यातली मानवता सुद्धा मेली आणि आपण आपल्या देश बांधवांसमवेत सहजीवन जगत नाही आणि जगण्याची इच्छाही नाही हे आपल्या कृतीने आपण सिद्ध करत आहोत. हे लक्षात घ्यावे.
लोकमत दैनिकाने भारत पाकिस्तान मालिकेच्या संदर्भात महासंग्राम नावाची एक पुस्तिका काही वर्षांपूर्वी काढली होती. त्यात जगदीश बिनीवाले यांचा तालिया बजाव वरना असे शीर्षक असलेला एक लेख छापला होता. त्या लेखात त्यांनी लिहिले होते...
पाकिस्तानी क्रिकेट संघ १9६०-६१ मध्ये फजल मेहमूदच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा २ डिसेंबर १९६० पासून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हिंदुस्तान पाकिस्तान पहिलाच कसोटी सामना खेळला गेला. त्यावेळी मी माटुंगा येथे रूपरेल कॉलेजमध्ये शिकत होतो. कसोटी सामना स्टेडियम मध्ये बसून पाण्याची पहिलीच वेळ होती. ईस्ट स्टॅंडची दैनिक तिकिटे काढली होती. स्टेडियम खचाखच भरले होते आमच्या मागे आजूबाजूला सर्वच पाकिस्तानचे पाठीराखे बसले होते. आम्ही कॉलेजची मुले काही टीकास्पद बोललो की ते भडकायचे. फजल महमूद हिंदुस्थानचे फलंदाज बाद करायचा तेव्हा आम्ही गप्प बसत होतो. आमच्या शेजारी बसलेले पाकिस्तानचे पाठीराखे आम्हाला विचारायचे क्या कोई मर गया है क्या? मुहँ लटका के बैठे हो? तालियाँ बजाव वरना आणि आम्हाला टाळ्या वाजवायला लावायचे. पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना बापू नाडकर्णी गोलंदाजी करू लागले की आम्ही आनंदाने ओरडू लागल्यावर केळीच्या सालांचा मारा आमच्यावर करण्यात येत होता. काहींनी आम्हाला धपाटे घातले. त्यानंतर आम्ही पुढचा सामना पाहायला स्टेडियमवर कधीच गेलो नाही.
या उताऱ्यात हिंदुस्थानातील हिंदू आणि मुसलमान यांची मानसिकता ठळकपणे व्यक्त झाली आहे. (संदर्भ, धर्मभास्करचा एप्रिल २००५ चा अंक, तानियाँ बजाव वरना...लेखक - अरविंद विठ्ठल कुळकर्णी)
माझ्या देश बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की, त्यांनी माझी भारतमाता परमेश्वराची लाडकी कन्या आहे, या सावरकरांच्या विधानाला आपल्या अंत:करणात कोरून ठेवावे. श्रीराम, श्रीकृष्ण, परशुराम असे विष्णूंचे विविध अवतार आहेत. असे अवतार धारण करून विष्णूने हिंदुस्तानच्या भूमीत जन्म घेतला. त्यामुळे ही भूमी पवित्र आणि पावन झाली आहे. भारतमातेची पवित्रता आपल्या वर्तनाने बाटणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. श्रीरामांना ही भूमी स्वर्गापेक्षाही अधिक प्रिय होती. याचाही विसर आपल्याला पडता कामा नये. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या की राष्ट्रभक्तीच आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टींपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, हे ध्यानात येण्यास वेळ लागणार नाही.
- दुर्गेश जयवंत परुळकर (प्रसिद्ध लेखक, व्याख्याते)
9833106812
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी