रायगड, 16 सप्टेंबर (हिं.स.) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनाने ‘स्वस्थ नारी निरोगी परिवार’ हे विशेष अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि.17 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले असून, याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी दिली.
या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे व त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे हा आहे. या शिबिरांमध्ये स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सिकलसेल रोग तपासणी व कार्ड वितरण, तोंड व स्तन कर्करोग तपासणी, मासिक पाळीतील स्वच्छता व पोषणविषयी मार्गदर्शन, रक्तदान शिबिरे, माता-बालक संरक्षण कार्ड, क्षयरोग तपासणी, लसीकरण, निक्षय मित्र मोहीम व इतर सामान्य आरोग्य समुपदेशन करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे या अभियानात सहभागी होणार आहेत. विशेषतः ५० वर्षांवरील महिलांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानामुळे महिलांमध्ये आरोग्य जागरूकता वाढून गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार वेळेत सुरू करता येतील. यामुळे ‘स्वस्थ नारी निरोगी परिवार’ हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून महिलांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या कुटुंबातील महिलांना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके