शाळेतच मिळाली पुस्तकांची भेट – विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढविण्याचा प्रयत्न
रायगड, 16 सप्टेंबर (हिं.स.) : प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका वाचनालय, अलिबाग येथील ग्रंथपाल सौ. ज्योती प्रकाश म्हात्रे यांनी लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अनोखा व स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या
शाळेतच मिळाली पुस्तकांची भेट – विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढविण्याचा प्रयत्न


रायगड, 16 सप्टेंबर (हिं.स.) : प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका वाचनालय, अलिबाग येथील ग्रंथपाल सौ. ज्योती प्रकाश म्हात्रे यांनी लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अनोखा व स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचे लक्ष मोबाईल, टीव्ही, गेम्स याकडे अधिक प्रमाणात वळत असताना पुस्तकांबद्दलची आवड कमी होत चालली आहे. हीच गरज ओळखून सौ. म्हात्रे यांनी शालेय स्तरावर वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

या उपक्रमाअंतर्गत अलिबाग नगरपरिषद शाळा क्र. २, ३ व ५ तसेच राजीप शाळा (तळ कावीर कावीर) येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना उपयुक्त व वाचनीय पुस्तके भेट देण्यात आली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, झाशीची राणी, संत गाडगे महाराज यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित पुस्तके तसेच बिरबलाच्या गोष्टीसारखी मनोरंजक व ज्ञानवर्धक पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आली.

प्रार्थनेच्या वेळेस किंवा शाळेत मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत ही पुस्तके वाचावीत, तसेच शिक्षकांनी त्या पुस्तकांवर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवावे, असे आवाहन सौ. म्हात्रे यांनी यावेळी केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच वाचनाची सवय निर्माण होईल व मुलांची सर्वांगीण प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या उपक्रमाचे पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. पुस्तक भेटीद्वारे मुलांना थोर नेत्यांचे विचार, प्रेरणादायी कथा आणि ज्ञानपर साहित्य थेट मिळाल्याने त्यांच्या वाचन संस्कृतीला चालना मिळणार आहे.

ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांचा हा उपक्रम समाजात एक वेगळी दिशा दाखवणारा ठरत असून, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी इतर संस्थांनीही अशा प्रकारच्या उपक्रमांतून पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande