रायगड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन यावर्षी ठरलेल्या वेळेत म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले असून, दुरुस्तीचे काम वारंवार अडथळ्यांत येत आहे.
ब्रिटिश काळात सुरू झालेली ही मिनी ट्रेन दरवर्षी 15 जून ते 15 ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत बंद ठेवली जाते. मात्र यंदा माथेरान परिसरात 5000 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. विशेषतः प्यारेनामा पॉईंटजवळ गणेशोत्सवाच्या आधी मोठी दरड कोसळून रेल्वे ट्रॅकचे प्रचंड नुकसान झाले. तेव्हापासून दर शनिवारी नेरळ-माथेरान मार्गावर रिकामी ट्रेनची चाचणीदेखील थांबवण्यात आली आहे.रेल्वे प्रशासनाने नॅरोगेज ट्रॅकची दुरुस्ती सुरू केली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. यामुळे ट्रॅकवर झाडे, मोठमोठे दगड आणि माती येऊन पडली असून दुरुस्तीचे काम अधिकच कठीण झाले आहे. सोमवारी रात्री माथेरान वॉटरफॉल परिसरात झालेल्या दरड कोसळीत ट्रॅक पुन्हा बाधित झाला. सुदैवाने ही दुर्घटना रात्री झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सध्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा बंद असली तरी पर्यटकांच्या सोयीसाठी माथेरान ते अमन लॉज या मार्गावर शटल सेवा सुरू आहे. मात्र नेरळ-माथेरान संपूर्ण मार्गावर रेल्वे वाहतूक पुन्हा नियमित करण्यासाठी रेल्वे प्रशासन तातडीने पावले उचलत आहे.यंदा सर्व सण लवकर आल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. परंतु 15 ऑक्टोबरपासून मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने पर्यटक व स्थानिक व्यापारी निराश झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके