अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.) एसटी संवर्गाच्या आरक्षणासाठी आज अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज आक्रमक पवित्र्यात रस्त्यावर उतरला. हजारोच्या संख्येने जमलेल्या बंजारा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
एकच मिशन – एसटी आरक्षण, हक्क आमचा देणार कोण?, हैदराबाद गॅझेट लागू करा अशा जोरदार घोषणा देत मोर्चेकरी मार्गक्रमण करत होते. महिलांचा आणि युवकांचा लक्षणीय सहभाग हे या मोर्चाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. समाजातील विविध गट, संघटना आणि नेत्यांनी एकत्र येत आरक्षणाच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटचा दाखला देत इतर जातींप्रमाणे आपल्यालाही एसटी आरक्षण देण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडली. मोर्चाच्या शेवटी समाजातील प्रमुख प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी