चंद्रपूर, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर निर्धारित वेळेत 8 हरकती अर्ज चंद्रपूर मनपा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.
महापालिकेच्या प्रभाग रचनेचे प्रारूप ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यावर हरकती.सूचना मागविण्यास सोमवार १५ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या कालावधीत १२ सप्टेंबर पर्यंत ६ तर अखेरच्या दिवशी २ असे एकुण ८ अर्ज मनपा प्रशासनास प्राप्त झाले. १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. सुनावणीदरम्यान अर्जदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार असुन त्यानंतरच अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे.
आक्षेपांवर सुनावणी होणे, त्यानंतर प्रभागरचना अंतिम करून शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविणे, नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविणे, निवडणूक आयोगाच्या अंतिम मंजुरीनंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे, अशी संपूर्ण प्रक्रिया १३ ऑक्टोबरपर्यंत नियोजित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव