गडचिरोली, 16 सप्टेंबर, (हिं.स.) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड या संवर्गातील रिक्त पदे अनुकंपाधारक उमेदवारांद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासन निर्णयान्वये व मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत या नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. यासंदर्भात ०१ जानेवारी २०२५ रोजीच्या प्रतिक्षाधिन सूचीतील उमेदवारांनी १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वीर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद गडचिरोली येथे समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
उमेदवारांनी आपल्या मुळ कागदपत्रांसह समुपदेशनास हजर राहणे आवश्यक आहे. अनुकंपाधारक उमेदवारांची नेमणूक शैक्षणिक पात्रता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियेद्वारे केली जाणार असून या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमीषाला किंवा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहनही श्री सुहास गाडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond