रायगड, 16 सप्टेंबर रायगड (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर) या कालावधीत रायगड जिल्ह्यात सेवा पंधरवडा प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानाचे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात (17 ते 22 सप्टेंबर) पाणंद/शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, मोजणी, सीमांकन व अतिक्रमणमुक्तीची कार्यवाही केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात (23 ते 27 सप्टेंबर) “सर्वांसाठी घरे” या उपक्रमांतर्गत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची मोहिम राबविली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर) नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार असून त्यामध्ये DBT पूर्णत्व, आयुष्मान भारत कार्ड वितरण, स्मशानभूमी जिओ-टॅगिंग, तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्रे, आदिवासी समाजाला तात्काळ दाखले, तसेच शाळा-महाविद्यालयात सेतू केंद्र सुरू करण्याचे उपक्रम राबविण्यात येतील.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार चंद्रसेन पवार, प्रकल्प अधिकारी कार्यालयातील श्रीमती तेजस्विनी गलांडे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके