रत्नागिरी, 16 सप्टेंबर, (हिं. स.) : ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या नव्या मराठी चित्रपटाचे प्रमोशन व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी चित्रपटाची टीम रत्नागिरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात उपस्थित होती. हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
प्रमोशनच्या सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, अभिनेत्री वीणा जामकर, निर्माते चारुदत्त सोमण आणि अन्य कलाकार सहभागी झाले होते.
महाविद्यालयातील बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांशी चित्रपट निर्मिती, कला आणि भविष्यात कोकणात होणाऱ्या चित्रपट निर्मितीबाबत विविध विषयांवर संवाद झाला. निर्माता चारुदत्त सोमण यांनी, “गेल्या २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा चित्रपट उभा राहिला आहे. गोगटे कॉलेजच्या नव्या विभागासाठी माझे संपूर्ण सहकार्य असेल, कारण मी याच कॉलेजचा १९८६ चा माजी विद्यार्थी आहे,” असे त्यांनी सांगितले.
अभिनेते वैभव मांगले (कॉलेजचे १९९५ चे माजी विद्यार्थी) यांनी स्वतःच्या संघर्षाविषयी सांगताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी कष्ट, प्रामाणिकपणा आणि बी-सी प्लॅन आवश्यक आहे. मी जुन्या आठवणींनी जोडलेलो आहे. वर्कशॉपसाठी नक्की येईन,” असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम यांनी विभागाची वाटचाल मांडली. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कॉलेज स्वायत्त असल्याने विविध बहुउद्देशीय अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगून, सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा. कश्मिरा सावंत, श्री. राजू जोशी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी १९ सप्टेंबर रोजी ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी