‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये दिसणार कलाकारांची भक्कम फौज
मुंबई, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ ची घोषणा केली होती. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर मनोरंजन करत भाष्य क
‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये दिसणार कलाकारांची भक्कम फौज!


मुंबई, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ ची घोषणा केली होती. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर मनोरंजन करत भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरच यात कलाकार कोण असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यात कलाकारांचे चेहरे जरी दिसत नसले तरी चित्रपटात दमदार कलाकारांची भक्कम फौज पाहायला मिळणार हे नक्की. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, तरुण पिढीचे स्टार्स अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर, लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग, कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळी प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे. या सर्व ताकदीच्या कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “माझे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात झालं आणि आता माझा हा चित्रपट जो मराठी शाळांबद्दलच आहे त्याचं चित्रीकरण मला याच भागात करता आलं याचा प्रचंड आनंद आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला होता आणि आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. माझ्यासोबत असलेले हे सर्व कलाकार आणि माझी संपूर्ण टीम या चित्रपटाची खरी ताकद आहेत. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande