गडचिरोली - सातबाऱ्यासाठी आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन
गडचिरोली, 16 सप्टेंबर, (हिं.स.) शेतकऱ्यांच्या जमिनीचा हक्क सांगणारा सातबारा हा त्यांच्या जीवनाचा आधार आहे. पण अहेरी तालुक्यातील तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना मागील चार वर्षांपासून सातबाऱ्यापासून वंचित ठेवून महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांची पिळवणूक केली
सातबाऱ्या आमदाराच्या घरासमोर आंदोलनचा पवित्रा


गडचिरोली, 16 सप्टेंबर, (हिं.स.)

शेतकऱ्यांच्या जमिनीचा हक्क सांगणारा सातबारा हा त्यांच्या जीवनाचा आधार आहे. पण अहेरी तालुक्यातील तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना मागील चार वर्षांपासून सातबाऱ्यापासून वंचित ठेवून महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे.शासनाने संगणकीकृत सातबारा, ई-पीक पाहणी, पारदर्शकता या नावाखाली मोठमोठे दावे केले. पण गावकऱ्यांना मात्र कार्यालयीन चकरा, निराशा आणि अन्यायच पदरी आला आहे.

गावातील शेतकऱ्यांना २०१८-१९ पर्यंत हस्तलिखित सातबारा मिळत होता. मात्र, ऑनलाईन सातबारा सुरू झाल्यापासून गावकऱ्यांना सातबारा मिळणेच बंद झाले.परिणामी २५० पेक्षा जास्त शेतकरी सातबाऱ्याविना शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत. पीक विमा, नुकसान भरपाई, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक काम, कर्ज सुविधा – सर्व काही अडथळ्यात.

५१ शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रख्यापण चार वर्षांपासून प्रलंबित आहे. सातबाऱ्याअभावी शेतकऱ्यांना बोनस मिळत नाही, शेततळे योजना, मच्छी गड्डा योजना, सिंचन सुविधा आणि अशा अनेक शासकीय योजनांचा लाभही बंद झाला आहे.

ग्रामस्थांनी तहसील, उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय यांचे उंबरठे झिजवले, पण प्रशासन बहिऱ्याचेच काम करत आहे. ही समस्या अनेकदा आमदार साहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत सांगण्यात आली. पण आम्हाला केवळ निवडणूक जवळ आल्यावर आश्वासन मिळाले, त्यापलीकडे काहीही झाले नाही, अशी ग्रामस्थांची नाराजी आहे.

या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी आता लढ्याचा बिगुल वाजवला आहे. ऑल इंडिया किसान सभा अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार यांच्या नेतृत्वाखाली समस्त गावकरी आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन छेडणार आहेत.

सातबाऱ्याविना आम्हाला बोनस नाही, योजना नाहीत, कर्ज नाही, भविष्य नाही. आमच्या घामाने सिंचित झालेल्या जमिनीला शासनाने ओळख द्यावीच लागेल. सातबारा व पट्टे मिळेपर्यंत आमचा लढा रस्त्यावर सुरू राहील,” असा ठाम इशारा ऑल इंडिया किसान सभेने दिला आहे.

हा लढा केवळ तुमिरकसा गावापुरता नाही, तर संपूर्ण अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. सातबाऱ्याविना शेतकरी म्हणजे बेघर नागरिकाप्रमाणे – ओळखहीन. शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या हक्काचे सातबारे द्यावे, अन्यथा या लढ्याची ठिणगी जिल्हाभर पेट घेईल, असा इशारा ऑल इंडिया किसान सभेने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande