रत्नागिरी, 16 सप्टेंबर, (हिं. स.) | चिपळूण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिक, सामाजिक संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण पालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांचा अटकाव व उपाययोजना या विषयावर महत्त्वाची बैठक बुधवारी, दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.
चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांकडून वारंवार नागरिकांवर हल्ले होत असून, यासंदर्भात तोंडी व लेखी स्वरूपात अनेक तक्रारी नगरपालिकेकडे दाखल झाल्या आहेत. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्याने या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने याबाबत बैठकीची मागणी पालिककेड केली होती. बैठकीत भटक्या कुत्र्यांचा अटकाव, निर्बंध, लसीकरण, निर्बीजीकरण, प्राणिप्रेमी संस्थांचा सहभाग, तसेच तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित राहणार असून, संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक प्रतिनिधींनाही बोलावण्यात आले आहे. नागरिकांनाही बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी