पत्रा चाळीच्या गुन्हेगारांना 'एसआरए' वर बोलण्याचा अधिकार नाही - नवनाथ बन
मुंबई, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। पत्रा चाळ घोटाळा तसेच हजारो कोटींचे घोटाळे केलेल्या घोटाळेबाज खा. संजय राऊत यांना एसआरए बद्दल ब्र देखील काढण्याचा अधिकार नाही. ''एसआरए'' मध्ये घोटाळा झाल्याचे बिनबुडाचे पोकळ आरोप करणा-या श्री. राऊत यांना आव्हान देत
पत्रा चाळीच्या गुन्हेगारांना 'एसआरए' वर बोलण्याचा अधिकार नाही - नवनाथ बन


मुंबई, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। पत्रा चाळ घोटाळा तसेच हजारो कोटींचे घोटाळे केलेल्या घोटाळेबाज खा. संजय राऊत यांना एसआरए बद्दल ब्र देखील काढण्याचा अधिकार नाही. 'एसआरए' मध्ये घोटाळा झाल्याचे बिनबुडाचे पोकळ आरोप करणा-या श्री. राऊत यांना आव्हान देत एसआरए घोटाळ्याबद्दल हवेत बाण सोडण्यापेक्षा पुरावा असलेला एक कागद दाखवा असे थेट आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी दिले. पुराव्याविना खोटे पसरवण्याचा धंदा राऊत यांनी त्वरित बंद करावा असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. एसआरएचे सर्व प्रकल्प पारदर्शक रित्या पार पडले असून एकाही ठिकाणी बेकायदेशीर टेंडर काढलेले नाही हे ठामपणे सांगत श्री. बन यांनी राऊत यांना लक्ष्य केले. कोविड काळातील डेड बॉडी बॅग, शवपेटी अगदी खिचडीच्या वाटपातल्या अनेक घोटाळ्यांची जंत्री वाचत त्यांनी राऊत यांची कोंडी केली.

शेतक-यांच्या प्रश्नी बोलताना श्री. बन यांनी उद्धव ठाकरे व राऊतांवर जोरदार प्रहार केला. शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांनी कर्जमाफीवर बोलू नये. 2017 मध्ये फडणवीस सरकारने संपूर्ण कर्जमाफी केली, मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड आणि नदीजोड योजना सुरू केल्या मात्र उद्धव ठाकरे सरकारने त्या प्रकल्पांवर गंडांतर आणलं. शेतकऱ्यांच्या पिकाशी, बांधाशी, जमिनीशी काहीही संबंध नसताना श्री. राऊत फुकाची भाषणं देतात पण देवेंद्र फडणवीस सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करतात, मोफत वीज ते पाणीपुरवठा अशा प्रत्येक योजनेत शेतक-यांना न्याय मिळवून देतात असे श्री. बन म्हणाले.

विकासाचा हिशोब आमच्याकडे, लूट व खंडणीचा हिशोब तुमच्याकडे

राज्याच्या विकासकामांचा ठळक उल्लेख करत श्री. बन यांनी विरोधकांच्या ‘कर्जबाजारी’ आणि ‘लूट’च्या आरोपांचा समाचार घेतला. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या भाग्यरेषा बदलत आहेत. आणि यातील प्रत्येक पैशाचा हिशोब आमच्याकडे आहे. ठाकरेंच्या कार्यकाळात पोलीस आयुक्तांनाच 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले गेले, रोजच्या खंडणीचा बाजार लावला गेला असे म्हणत ठाकरेंच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले. आम्ही जनतेसाठी प्रकल्प उभे केले, तुम्ही मात्र स्वतःसाठी अलिबागला फार्महाऊस बांधले अशी बोचरी टिप्पणीही श्री. बन यांनी केली. कोण विकास घडवतो आणि कोण जनतेच्या पैशांतून स्वत:च्या तुंबड्या भरतो हे सूज्ञ जनता जाणते अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

लोकनेते मोदींवर थुंकायचा प्रयत्न केला तर थुंकी राऊतांच्या तोंडावर उडेल !

पंतप्रधानांचा वाढदिवस सरकारी पद्धतीने साजरा होतो असे म्हणत टीका करणा-या श्री. राऊत यांना चोख प्रत्युत्तर देत श्री. बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमाखातर त्यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात सर्वसामान्य जनता उत्स्फूर्तपणे साजरा करते. 2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन वेळा जनतेने बहुमत देऊन पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला. मोदींवर टीका म्हणजे जनतेच्या निर्णयावर आक्षेप असे म्हणत राऊत आणि ठाकरे कधीच जनतेतून निवडून आले नाहीत याचा पुनरुच्चार श्री. बन यांनी केला. विरोधकांनी आधी निवडणूक जिंकावी, मग टीका करावी. जनतेचा आशीर्वाद मोदींच्या पाठीशी आहे तर दुसरीकडे विरोधकांना मात्र शिव्यांची लाखोली मिळते. तेव्हा लोकनेते मोदींवर थुंकायचा प्रयत्न श्री. राऊत जेव्हा जेव्हा करतात तेव्हा ती थुंकी परत त्यांच्या तोंडावरच उडते असा टोलाही त्यांनी लगावला. लोकनेते पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी संपूर्ण देशभरात समाजातील प्रत्येक घटक स्वयंस्फूर्तीने सामील होतो, तर राऊत यांचा वाढदिवस साधा भांडुपच्या गल्लीत तरी साजरा होतो का असा बोचरा सवाल श्री. बन यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande