पुणे, 16 सप्टेंबर, (हिं.स.)राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वप्न पाहिलेल्या स्वच्छ भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत पिंपरी चिंचवड महापालिकेकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेला सामाजिक चळवळीचे रूप देणे,नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
महापालिकेने या अभियानांतर्गत १६ दिवसांच्या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण,लोकसहभाग वाढवणारे कार्यक्रम आखले असून त्यातून नागरिकांना प्रत्यक्ष कृतीतून सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमांमध्ये नागरिक,व्यापारी वर्ग,स्वयंसेवी संस्था,महिला गट व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोहीमेत मुख्य रस्ते, बाजारपेठा, बसस्थानके, उद्याने व जलाशय परिसराची स्वच्छता, सफाई मित्रांसाठी आरोग्य तपासणी, सुरक्षा साधनांचे वितरण व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
स्वच्छ हरित महोत्सव : या महोत्सवांतर्गत पर्यावरणपूरक उत्पादने,वृक्षारोपण उपक्रम,हरित जीवनशैलीवरील कार्यशाळा व प्रदर्शन घेण्यात येईल.
प्लास्टिक प्रदूषणविरोधी जागरूकता : या उपक्रमांतर्गत सिंगल-यूज प्लास्टिक टाळण्यासाठी पर्यायी उपाययोजनांची माहिती देण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु