अकोला : गावोगाव मोहीम राबवून गरजूंना लाभ मिळवून द्यावा - पालकमंत्री
अकोला, 17 सप्टेंबर (हिं.स.) : सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात गावोगाव व्यापक मोहीम राबवून गरजूंना ‘सर्वांसाठी घरे’, ‘पाणंदरस्ते योजना’ व आवश्यक महसूली सेवांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.
प


अकोला, 17 सप्टेंबर (हिं.स.) : सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात गावोगाव व्यापक मोहीम राबवून गरजूंना ‘सर्वांसाठी घरे’, ‘पाणंदरस्ते योजना’ व आवश्यक महसूली सेवांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले.

महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात ‘सेवा पंधरवड्याचा’ शुभारंभ आज नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. पंधरवड्यात राष्ट्रनेता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत मोहिम राबविण्यात येत आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘ई-भूमिती सॉफ्टवेअर’चे अनावरणही यावेळी झाले. जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर व निखिल खेमनार आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट घेऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार पाणंदरस्ते, सर्वांसाठी घरे व लोकअदालती याबाबत प्रत्येक टप्प्यात 'मिशन मोड'वर कामे होऊन जिल्ह्यात सर्वदूर आणि व्यापक अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सुयोग्य पांदणरस्ता, गरजूंना घरे, तसेच अतिक्रमणे नियमानुकुल करणे आणि आवश्यक प्रमाणपत्र, दाखल्यांचे वितरण या सर्व उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ई-गव्हर्नन्सवर भर : जिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाकडून ई- गव्हर्नन्सवर भर देण्यात येणार असून, त्याअंतर्गत ई-भूमिती हा प्रकल्प शासकीय जमिनींच्या डेटाबेससाठी उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी सांगितले. महसूल विभागाच्या या उपक्रमांचा लाभ जलदगतीने व सुलभतेने नागरिकांना मिळावा यासाठी सर्वांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडण्याचे, तसेच नागरिकांनीही या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पाणंद रस्तेविषयक मोहीम (17 – 22 सप्टेंबर, 2025)

शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण व नोंदी अद्ययावत करणे, शेतरस्त्यासाठी संमतीपत्र प्राप्त करणे. प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे. अकोला जिल्ह्यातील 52 गावे निवडून, 248 रस्त्यांना संकेतांक देऊन सीमांकन पूर्ण करणे आदी कामे केली जातील.

‘सर्वांसाठी घरे’ योजना (23 – 27 सप्टेंबर, 2025)

घरे बांधण्यासाठी उपलब्ध शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे, अतिक्रमणाचे नियमन व पट्टे वाटप करणे आदी कामे केली जातील.

लोकअदालती व महसूली सेवा (28 सप्टेंबर – 2 ऑक्टोबर, 2025)प्रलंबित अर्जांवर कार्यवाही करून जिवंत सातबारा अद्ययावत करणे,

मंडळ स्तरावर महाराजस्व अभियान राबवून प्रमाणपत्र वाटप, महसूल प्रकरणांचे तडजोडीने निपटारा करण्यासाठी लोकअदालतींचे आयोजन आदी कामे केली जातील.जिल्ह्यातील शासकीय जमिनींचा सुसंगत व पारदर्शक डाटाबेस तयार करण्यासाठी हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सेवा पंधरवड्यानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी व डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande