अकोला, 17 सप्टेंबर (हिं.स.)।महिला ही संपूर्ण कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा, देशाचा आधार असते. महिला सशक्त झाल्याशिवाय सुदृढ भारताची कल्पना करता येणार नाही. त्यामुळे महिलांच्या निरामय आरोग्यासाठी विविध तपासण्या, उपचार व मार्गदर्शनासाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ’स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालय येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, आरोग्य उपसंचालक डॉ.सुशीलकुमार वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, डॉ. अभिजीत फडणीस आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, कुटुंबात महिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कुटुंबाची काळजी घेता घेता त्यांच्याकडेच दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे महिलाभगिनींचे आरोग्य राखण्यासाठी शासनाने हे अभियान सुरू केले आहे. मधुमेह, कर्करोग, क्षयरोग अशा आजारांच्या नियमित तपासण्या, लसीकरण, उपचार व मार्गदर्शन गावपातळीपासून महानगरापर्यंत शिबिरांच्या माध्यमांतून मिळवून देण्यात येईल. हा उपक्रम अभियानाच्या कालावधीपुरता न ठेवता वर्षभर राबवला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनीही मनोगत व्यक्त केले.
विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन
या मोहिमेत आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये तपासणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित केली जातील. जिल्हा रुग्णालय ,जिल्हा स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे विशेषज्ञाव्दारे तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत.खाजगी महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्नित रुग्णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
महिलांची आरोग्य तपासणी
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी करणे.जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग (Tuberculosis) तपासणी. किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत समुपदेशन.
माता आणि बाल आरोग्य सेवा
गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी (ANC) तपासणी व समुपदेशन करणे.हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन. बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण केले जाईल.
आयुष सेवा
याअंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्द व नॅचरोपॅथी इ. पर्यायी उपचार पध्दतींची सेवा गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे आयोजित केली जातील. महिला बचत गट (SHGs) आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर समुपदेशन. पोषण समुपदेशन व निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे