चंद्रपूर जिल्ह्यातील 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली
चंद्रपूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाने ‘आयोग आपल्या जिल्ह्यात’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील माहिती अधिकार अधिनियमाची 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली काढली आहेत. नागपूर खंडपीठाचे मुख्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यां
चंद्रपूर जिल्ह्यातील 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली


चंद्रपूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाने ‘आयोग आपल्या जिल्ह्यात’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील माहिती अधिकार अधिनियमाची 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली काढली आहेत. नागपूर खंडपीठाचे मुख्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेऊन सदर प्रकरणांचा निपटारा केला आहे.

याबाबत बोलतांना आयुक्त गजानन निमदेव म्हणाले, राज्य माहिती आयोगाच्या वतीने ‘आयोग आपल्या जिल्ह्यात’ असा उपक्रम राबविला जात आहे. वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे आयोग सुनावणीसाठी आला. ज्या जिल्ह्यातील अपील आहे, तेथे जाऊन सुनावणी करायची आणि माहिती अधिकार अधिनियम - 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करायची, हा नागपूर खंडपीठाचा मुख्य हेतू आहे. जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि नागरिक यांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचावा, या हेतूने हा उपक्रम नागपूर खंडपीठाने सुरू केला आहे आणि त्याची यशस्वी सांगता पहिला टप्पा पूर्ण होऊन झाली आहे.

पुढे ते म्हणाले, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 675 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 200 प्रकरणांचा समावेश आहे. राज्यात असा पुढाकार घेणारे नागपूर खंडपीठ हे पहिलेच असावे. याचा नागरिकांना आणि अधिकाऱ्यांनाही भरपूर फायदा झाला आहे. पाचही जिल्ह्यातील जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकाऱ्यांनी आणि अपीलकर्त्यांनी आयोगाला धन्यवाद दिले आहे आणि आयोगाच्या या उपक्रमाची प्रशंसा सुद्धा केली आहे.पुढील काळात अशाच प्रकारे आयोगाच्या भेटी जिल्ह्यांना सुरू राहतील. ज्या जिल्ह्यातील अपील आहे, तेथे जाऊन त्या निकाली काढल्या जातील. या उपक्रमांतर्गत सन 2022 -23 मधील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आयोगाला यश आले आहे. आयोगाच्या सर्व सहकाऱ्यांचे यासाठी विशेष योगदान लाभले आणि त्यांच्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande