अबुधाबी, १७ सप्टेंबर (हिं.स.). आशिया कप २०२५ च्या ग्रुप-ब च्या नवव्या सामन्यात बांगलादेशने रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानचा ८ धावांनी पराभव केला आणि स्पर्धेत आपले स्थान मजबूत केले. शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत ५ गडी बाद १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानचा संघ १४६ धावांवर सर्वबाद झाला.
बांगलादेशकडून तन्जीद हसन तमीमने सर्वात मोठी खेळी केली. त्याने ४१ चेंडूत ५२ धावा करत संघाला चांगली सुरुवात दिली. मधल्या फळीत सैफ हसनने ३० धावा जोडल्या, तर कर्णधार लिटन दासने २५ धावांचे योगदान दिले.अफगाणिस्तानकडून नूर अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने ४ षटकांत २५ धावा देत २ गडी बाद केले.बांग्लादेशने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने चांगली सुरुवात केली. सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाजने ३५ धावा केल्या, तर अझमतुल्लाह उमरझाईने ३० धावांची खेळी केली. पण मधल्या फळीत सतत विकेट पडल्याने अफगाणिस्तानचा डाव डळमळीत झाला. कर्णधार राशिद खानने काही चांगले फटके मारले, पण संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला. रिशाद हुसेन आणि तस्किन अहमदने २-२ विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रहमान आणि इतर गोलंदाजांनीही अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अचूक लाइन-लेंथसह मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. शेवटच्या षटकांमध्ये अफगाणिस्तानला विजयासाठी जलद धावांची आवश्यकता होती. पण बांगलादेशी गोलंदाजांनी संयम दाखवला आणि संघाला १४६ धावांवर रोखले. या विजयासह बांगलादेशने स्पर्धेत सुपर-४ च्या आशा आणखी मजबूत केल्या आहेत.
--------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे