आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत उद्यापासून दोन दिवसीय बांबू परिषद
* जगभरातील तज्ज्ञ, अभ्यासक व गुंतवणूकदार राहणार उपस्थित - पाशा पटेल मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - बांबू उत्पादनातून आर्थिक चालना मिळण्यासाठी तसेच बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय बांबू
आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत उद्यापासून दोन दिवसीय बांबू परिषद


* जगभरातील तज्ज्ञ, अभ्यासक व गुंतवणूकदार राहणार उपस्थित - पाशा पटेल

मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - बांबू उत्पादनातून आर्थिक चालना मिळण्यासाठी तसेच बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशन यांच्यामार्फत मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. 18 आणि 19 सप्टेंबर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ही बांबू परिषद होणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल व वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ अशी संकल्पना घेऊन या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसाच्या परिषदेतून पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी नवी दिशा मिळेल.

श्री. पटेल यांनी सांगितले की, दोन दिवसीय परिषदेत पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. जगभरातील देशभरातील आणि राज्यभरातील तज्ज्ञ, अभ्यासक, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी आणि धोरणकर्ते यांना परिषदेत निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी बांबूपासून इथेनॉल, मिथेनॉल, थर्मलसाठी बांबू पॅलेट्स, लोखंड चारकोल, लाकूड, फर्निचर, बांबू कपडे अशा अनेक उत्पादनांसंबंधी चर्चा होणार आहे. शहरी वनीकरण, ऑक्सिजन पार्क, ग्रीन बिल्डिंग अशा अनेक नवकल्पना या परिषदेतून पुढे येणार आहेत.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राज्य शासनाचे प्रतिनिधी, याविषयावरील अभ्यासक आणि उद्योजकांची गोलमेज परिषद होणार आहे. सुमारे 35 उद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेत 20 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत, अशी माहिती पाशा पटेल यांनी दिली.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये बांबू लागवड वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नैसर्गिक आपत्ती टाळणे, वनक्षेत्र वाढवणे आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे हे शासनाचे ध्येय आहे. त्यानुसारच बांबू लागवडीसाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी, वनक्षेत्राजवळील शेतामध्ये बांबू लागवड करण्यासाठी मुख्यमंत्री वनसंवर्धन धोरण तयार केले असून त्यावर नागरिकांची मते मागविण्यात आली आहेत. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी बांबू पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि उद्याचा कार्यक्रम त्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल आहे.

जागतिक बांबू दिवस 2025, मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://forms.gle/8DuP4NgUx7GfvXVQ9

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande