बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी बीडमध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री पवार ध्वजारोहण करण्यासाठी बीडमध्ये दाखल झाले. त्यांचा ताफा नगर नाका परिसरात येताच दोन तरुणांनी त्यांच्या ताफ्यासमोर धाव घेतली आणि अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण केज तालुक्यातील कुंभेफळ येथील आहेत. त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या कामाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊनही कार्यवाही झाली नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. यावेळी तरुणांनी 'न्याय द्या, न्याय द्या अजित दादा न्याय द्या' अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
पालकमंत्री पवार शहरात येणार असल्यामुळे आधीपासूनच सुरक्षेबद्दलची खबरदारी घेण्यात आली होती. पण, अचानक दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची त्यांना पकडताना दमछाक झाली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis