भोपाळ, 17 सप्टेंबर (हिं.स.)। सध्याचा काळ सणांचा आहे. या काळात सर्व देशवासियांना देशातच बनलेल्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे. ते मध्य प्रदेशातील धार येथे एका जनसभेला संबोधित करताना बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हा काळ सणांचा काळ आहे. या काळात तुम्हाला ‘स्वदेशी’चा मंत्र सातत्याने उच्चारायचा आहे आणि तो आपल्या जीवनात उतरवायचा आहे. माझी १४० कोटी देशवासियांना हात जोडून प्रार्थना आहे की तुम्ही जे काही खरेदी करता, ते देशातच बनलेले असावे. तुम्ही जे काही खरेदी करता, त्यामध्ये एखाद्या भारतीयाचे घाम असावा. तुम्ही जे काही खरेदी करता, त्यात माझ्या भारताच्या मातीचा सुगंध असावा.”
पुढे ते म्हणाले, “व्यापारी बंधूंनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशासाठी माझी मदत करा. देशासाठी माझ्या सोबत चला. मला २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे आणि त्या दिशेने जाणारा मार्ग म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’. सर्व छोटे-मोठे व्यापारी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही जे काही विकता, ते देशातच तयार झालेले असावे. महात्मा गांधींनी स्वदेशीला स्वातंत्र्याचं माध्यम बनवलं होतं. आता आपल्याला स्वदेशीला ‘विकसित भारत’च्या पायाभूत तत्वांपैकी एक बनवायचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “हे काम तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आपण आपल्या देशात बनलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान बाळगू. आपण मुलांसाठी खेळणी खरेदी करत असो, दिवाळीच्या मूर्ती, घर सजावटीसाठी साहित्य, मोबाईल, टीव्ही, फ्रीजसारख्या वस्तू – सर्वात पहिले आपल्याला हे पाहायचं आहे की ही वस्तू आपल्या देशात बनलेली आहे का?
जेव्हा आपण स्वदेशी वस्तू खरेदी करतो, तेव्हा आपला पैसा देशातच राहतो, तो परदेशात जाण्यापासून वाचतो. आणि हाच पैसा देशाच्या विकासासाठी वापरला जातो – रस्ते बनवले जातात, गावात शाळा उभ्या राहतात, गरीब विधवा मातांना मदत दिली जाते, ती तुमच्यापर्यंत पोहोचते. मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी भरपूर पैशाची गरज असते, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींतून हे शक्य होते.
२२ सप्टेंबरपासून, म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवशीपासून जीएसटीचे कमी दर लागू होणार आहेत. आपण स्वदेशी वस्तू खरेदी करून त्याचा लाभ घ्यायला हवा. आपल्याला एक मंत्र कायम लक्षात ठेवायला हवा – ‘मी इच्छितो की प्रत्येक दुकानावर लिहिलं असावं – “गर्वाने म्हणा, हे स्वदेशी आहे!”’
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode