पुरी,17 सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे. या खास दिनानिमित्त प्रसिद्ध रेत शिल्पकार पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या ब्लू बीचवर वाळूच्या माध्यमातून एक आकर्षक शिल्प तयार करून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
या शिल्पामध्ये 'पीएम मोदींसोबत भारताची झेप' असा संदेश कोरला असून, कमळाच्या फुलांचे सुद्धा सुंदर चित्रण करण्यात आले आहे, ज्यामुळे ही कलाकृती अधिकच मनोहारी वाटते. या रेत शिल्पकलेच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या दशकात साधलेल्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडवले आहे सुदर्शन पटनायक यांनी त्यांच्या वाळू शिल्पामध्ये 'मेक इन इंडिया', 'डिजिटल इंडिया', 'स्वच्छ भारत' आणि ग्रामीण विकास अशा महत्त्वाच्या योजना अधोरेखित केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सतत नवे शिखर गाठत आहे. पुरीचा समुद्रकिनारा या सुंदर कलाकृतीमुळे खुलून गेला आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिक या कलाकृतीकडे आकर्षित होत असून ती सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. लोकांकडून या शिल्पकलेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
सुदर्शन पटनायक हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाळू शिल्पकार आहेत. त्यांनी अवघ्या सातव्या वर्षी वाळूवर कलाकृती तयार करायला सुरुवात केली. आज त्यांची कला जगभर ओळखली जाते. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले असून, त्यांची वाळू शिल्पकला जणू सजीव वाटते. यासंदर्भात सुदर्शन पटनायक म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देश-विदेशातून लोक शुभेच्छा देत आहेत. आम्ही पुरी बीचवर 750 कमळांची सजावट करत हे वाळू शिल्प तयार केले आहे. भगवान जगन्नाथ यांच्या चरणी प्रार्थना करतो की पंतप्रधानांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो. अशा शब्दात त्यांनी मोदींचे अभिष्टचिंतन केले आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी