देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज; महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हाय अलर्ट
मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशभरात मुसळधार पावसाचा इशारा देत अनेक राज्यांना हाय अलर्ट दिला आहे. १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत उत्तराखंड, बिहार, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातसह विविध राज्यांत जोरद
Heavy rains


मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशभरात मुसळधार पावसाचा इशारा देत अनेक राज्यांना हाय अलर्ट दिला आहे. १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत उत्तराखंड, बिहार, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातसह विविध राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि रायलसीमा परिसरात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.

गेल्या चार महिन्यांपासून देशाला भिजवून काढणारा नैऋत्य मान्सून आता हळूहळू माघार घेत आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून तो परतण्यास सुरुवात झाली असली तरी त्याचा परिणाम अजूनही उर्वरित राज्यांत दिसून येत आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की नवरात्रीपर्यंत अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहू शकतो.

पश्चिम भारतात महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व गोव्यात १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुजरातच्या अनेक भागांमध्येही मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तर भारतात १६ आणि १७ सप्टेंबर रोजी उत्तराखंड व पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाबरोबरच जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पूर्व व मध्य भारतातही पावसाचे सत्र सुरूच राहणार आहे. बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये १६ आणि १७ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज असून झारखंड, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. १७ ते २० सप्टेंबर दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर सतत पाऊस कोसळेल, असेही आयएमडीने सांगितले आहे.

पूर्वोत्तर भारतात आसाम आणि मेघालयात आठवडाभर पाऊस सुरू राहणार असून नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान सतत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र अरुणाचल प्रदेशाला सध्या काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.

दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळच्या काही भागांत १६ ते १९ सप्टेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश व रायलसीमा भागात पुढील पाच दिवस ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे, नदीकाठी किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक व दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande