नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा तब्बल २९३३ कोटी रुपयांचा थकीत निधी येत्या १५ दिवसांत वितरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज दिली आहे. या बैठकीत आर्थिक तरतुदींना वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ओबीसी समाजाच्या विविध योजनांसाठी निधीचे नियमित वाटप होईल आणि दर आठवड्याला त्याचा आढावा घेतला जाईल.
तसेच, विविध महामंडळांसाठी १७५० कोटी रुपयांची नवी मागणी डिसेंबर महिन्यातील पुरवणी मागणीत सादर करण्यात येणार असून, यामध्ये इतर मागासवर्गीय महामंडळाला १००० कोटी आणि संलग्न मंडळाला ७५० कोटींचा समावेश आहे.याशिवाय, राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ओबीसी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून १६ जिल्ह्यांत भूसंपादनासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमधील त्रुटी दूर करून थकीत रक्कम लवकरच वितरित केली जाणार आहे. तसेच, जालना येथील दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी आणि आर्थिक मदत देण्याचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला. या निर्णयांमुळे ओबीसी समाजाच्या दीर्घकाळच्या मागण्यांना प्रतिसाद मिळणार असून प्रशासकीय कामकाजालाही गती मिळणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis