बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएममध्ये रंगीत फोटोसह मतपत्र
नवी दिल्ली,17 सप्टेंबर (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वापरण्याबाबत नव्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली आहे. यानुसार, यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमवरील मतपत्रांवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जाणार आहेत. ही प्रणाली देशात प्रथमच बिहारमध्ये अमलात येणार असून, मतदारांना उमेदवारांची ओळख पटवण्यात अधिक सुलभता मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूक संचालन नियम, 1961 मधील नियम 49बी अंतर्गत सुधारणा करत मतपत्र अधिक स्पष्ट, सुबोध आणि वाचनीय करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीत खालील महत्त्वाच्या बाबी अंतर्भूत आहेत:
1. उमेदवारांचे रंगीत फोटो : ईव्हीएमवरील मतपत्रात उमेदवारांचा चेहरा फोटोच्या तीन-चतुर्थांश भागात असलेला असेल, जेणेकरून ओळख अधिक स्पष्ट होईल.
2. क्रमांक आणि नावाचे सादरीकरण : सर्व उमेदवारांचे किंवा नोटा (कोणताही उमेदवार नाही) यांचे क्रमांक आंतरराष्ट्रीय भारतीय अंकपद्धतीत, 30 फॉन्ट साइजमध्ये बोल्ड अक्षरांत छापले जातील. तसेच सर्व नावे एकाच फॉन्ट आणि वाचण्यास सोप्या आकारात असतील.
3. कागदाचा दर्जा : मतपत्र 70 जीएसएम दर्जाच्या कागदावर छापले जाणार असून, विधानसभा निवडणुकीसाठी खास गुलाबी रंगाच्या कागदाचा वापर केला जाणार आहे, ज्यामध्ये विशिष्ट आरजीबी रंगमान वापरले जातील.
4. ईव्हीएमचा अपग्रेडेड अवतार : या नव्या तंत्रज्ञानाचा वापर बिहारपासून सुरू होत असून, पुढील सर्व निवडणुकांमध्ये हे सुधारित ईव्हीएम मतपत्र वापरण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने यापूर्वीही गेल्या 6 महिन्यांत निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि मतदार हितासाठी सुलभ करण्यासाठी एकूण 28 सुधारणा केल्या आहेत. ईव्हीएममधील हे नवे बदल त्याच सुधारणांच्या पुढील टप्प्याचा भाग आहेत.--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी