गडचिरोली, 17 सप्टेंबर (हिं.स.)
गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दोन महिला माओवादी ठार झाल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगल परिसरात ही चकमक घडली. ठार झालेल्या माओवाद्यांपैकी एक कमांडर आणि दुसरी एसीएम दर्जाची होती. त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
बुधवार, १७ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, गट्टा दलमचे काही माओवादी मोडस्के जंगल परिसरात दबा धरून बसले आहेत. या माहितीवर त्वरित कारवाई करत, अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखालील विशेष अभियान पथकाने जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. यावेळी, दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर, पोलिसांनी केलेल्या शोध मोहिमेत दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळले.
मृत महिला माओवाद्यांची ओळख पटली असून, त्या खालीलप्रमाणे
* सुमित्रा उर्फ सुनीता वेलादी : ही गट्टा दलमची कमांडर होती आणि तिच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. तिच्यावर ३१ गंभीर गुन्हे दाखल होते.
* ललिता उर्फ लड्डो उर्फ संध्या कोरसा : ही गट्टा दलमची एसीएम होती आणि तिच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस होते. ती गट्टा दलमचा डिव्हीसीएम राजू वेलादीची पत्नी होती.
जप्त केलेली शस्त्रे
घटनास्थळावरून पोलिसांना एक एके-४७ रायफल, एक पिस्तूल, ३७ जिवंत काडतुसे आणि इतर माओवादी साहित्य जप्त करण्यात यश आले आहे.
या कामगिरीबद्दल गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सी-६० आणि सीआरपीएफच्या जवानांचे कौतुक केले आहे. तसेच, त्यांनी माओवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond