भारताचे धैर्य ही त्याची ताकद असून दुर्बलता नाही - राजनाथ सिंह
हैदराबाद, 17 सप्टेंबर (हिं.स.) - ‘ऑपरेशन सिंदूर, 2016 चा लक्ष्यभेदी हल्ला आणि 2019 बालाकोट हवाई हल्ला हे भारताचे धैर्य ही त्याची ताकद असून, दुर्बलता नाही, तसेच जेव्हा वाटाघाटी अयशस्वी ठरतात तेव्हा आम्ही कठोर शक्तीचा मार्ग निवडतो, याचा दाखला आहे’, अस
राजनाथ सिंह


हैदराबाद, 17 सप्टेंबर (हिं.स.) - ‘ऑपरेशन सिंदूर, 2016 चा लक्ष्यभेदी हल्ला आणि 2019 बालाकोट हवाई हल्ला हे भारताचे धैर्य ही त्याची ताकद असून, दुर्बलता नाही, तसेच जेव्हा वाटाघाटी अयशस्वी ठरतात तेव्हा आम्ही कठोर शक्तीचा मार्ग निवडतो, याचा दाखला आहे’, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. तेलंगणामधील हैदराबाद येथे बोलताना त्यांनी अधोरेखित केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मजबूत आणि दृढनिश्चयी नवा भारत संवादावर विश्वास ठेवतो, मात्र शांतता आणि सद्भावनेची भाषा समजण्यात अपयशी ठरणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे तो जाणतो.

संरक्षणमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले की, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धर्माच्या आधारावर निष्पाप नागरिकांची हत्या केली, तर भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवाद्यांना त्यांच्या कर्माच्या आधारावर ठार केले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील त्यांचे अड्डे नष्ट केले.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीचे श्रेय सशस्त्र दलांच्या शौर्याला आणि समर्पणाला देत त्यांनी पुनरुच्चार केला की, ही कारवाई सध्या केवळ स्थगित ठेवण्यात आली आहे, आणि सीमेपलीकडून दहशतवादी कारवाई घडली, तर ती पूर्ण ताकदीनिशी पुन्हा सुरू केली जाईल. ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धविरामाबाबत भारताने तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नाकारला होता, असे सांगून ते म्हणाले की, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही तिसरा पक्ष हस्तक्षेप करू शकत नाही.

उत्तर आणि दक्षिण भारताला एकत्र आणण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी 'लोहपुरुष' म्हणून बजावलेल्या भूमिकेची राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. हैदराबाद मुक्ती दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर या एकाच दिवशी येतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले, आणि ते म्हणाले की, सरदार पटेल यांच्याप्रमाणेच आपले पंतप्रधान भारताला सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी काम करत आहेत.

ऑपरेशन पोलोमध्ये सहभागी झालेल्यांच्या धाडसाची राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर सरदार पटेल यांच्या निर्णायक प्रहाराने रझाकारांचे कारस्थान उधळून लावले आणि हैदराबादला पुन्हा भारताशी जोडले.

“1948 मध्ये ज्याप्रमाणे रझाकारांचे कारस्थान उधळले गेले, त्याचप्रमाणे आज पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्याचे एजंट फोल ठरले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपली एकता आणि सांस्कृतिक विविधता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे हे आपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे,” संरक्षण मंत्री म्हणाले.

या कार्यक्रमा दरम्यान, राजनाथ सिंह यांनी हैदराबादच्या केंद्रीय संचार ब्युरोने आयोजित केलेल्या हैदराबाद मुक्ती दिनाच्या छायाचित्र प्रदर्शनालाही भेट दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande