गडचिरोली., 17 सप्टेंबर (हिं.स.) नक्षलवाद्यांविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एटापल्ली तालुक्यात जांबिया गटा जंगल परिसरात आज, बुधवारी झालेल्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार झाल्या आहेत. या चकमकीनंतर घटनास्थळावरून एक अत्याधुनिक AK-47 रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार गडचिरोली पोलीस दलाला एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांबिया अंतर्गत येणाऱ्या मौजा मोडस्के जंगल परिसरात गट्टा दलमचे काही माओवादी दबा धरून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, तात्काळ कारवाई करत अपर पोलीस अधीक्षक श्री. सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सी-60 ची 5 पथके अहेरीहून रवाना करण्यात आली. या अभियानामध्ये पोस्टे गट्टा जांबियाचे पोलीस पथक आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या ई कंपनीने जंगलाला बाहेरून वेढा घातला. पोलीस पथकांनी शोधमोहीम सुरू करताच दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमक थांबल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध घेतला. या शोध मोहिमेदरम्यान दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. तसेच, घटनास्थळावरून एक स्वयंचलित एके-47 रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, मोठ्या प्रमाणात जिवंत दारूगोळा आणि माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. या परिसरामध्ये अजूनही माओवादविरोधी शोध अभियान सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond