कोल्हापूर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : कोल्हापूरचे सुपुत्र,ज्येष्ठ अणुसंशोधक, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र, कल्पकमचे निवृत्त संचालक, पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधन झालेते 83 वर्षाचे होते. गेले काही वर्षे फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. कोल्हापूरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. चार दिवसापूर्वी त्यांना हॉस्पिटल मधून सांगाव येथील घरी आणले होते. घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी आणण्यात आले. घराशेजारी मंडपात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या पार्थिवावर विविध मान्यवर, ग्रामस्थ व नातेवाईकांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी झालेल्या शोकसभेत दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या रजनी मगदूम, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, सरपंच विरश्री जाधव, अनिल पाटील, आप्पासाहेब टाकळे, अनुशास्त्रज्ञ बी.एच. पाटील, ॲड. बाळासाहेब देशपांडे, ॲड. बाबासाहेब मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत डीएम हायस्कूलसह विविध शाळांचे विद्यार्थी, भजनी मंडळ, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
डॉ. भोजे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, भावजय, पुतणे,बहिणी असा परिवार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगाव हे त्यांचे मूळ गाव प्रगतीशील शेतकरीबाबुराव भोजे हे त्यांचे वडील, लहानपणापासून हुशार अभ्यासू असलेले डॉ. शिवराम भोजे हे एक प्रतिष्ठित भारतीय अणुशास्त्रज्ञ बनले. ज्यांना फास्ट-ब्रीडर न्यूक्लियर रिअॅक्टर तंत्रज्ञानाचा ४० वर्षांहून अधिक अनुभव होता. त्यांनी इंदिरा गांधी सेंटर फॉर अणु संशोधनात काम केले आणि फास्ट ब्रीडर टेस्ट रिअॅक्टरच्या डिझाइन, बांधकाम आणि ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता.
पुरस्कार आणि मान्यता : -विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानासाठी त्यांना २००३ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री मिळाला. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना वासविक औद्योगिक संशोधन पुरस्कार आणि एच के फिरोदिया पुरस्कार देखील मिळाला होता- निवृत्तीनंतर, डॉ. भोजे शिवाजी विद्यापीठात शैक्षणिक सल्लागार म्हणून काही वर्षे कार्यान्वित होते.शिवायऑल इंडिया बोर्ड ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट एज्युकेशन अँड रिसर्च इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सदस्य होते.
त्यांना डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून मानद डी. लिट बहाल करण्यात आली होती.
साधी राहणी व उच्च विचारसरणी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील थोर अणुशास्त्रज्ञास आपण मुकलो.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar