रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांना केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाकडून दिला जाणारा सर्वोच्च राजभाषा सन्मान पुरस्कार रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला घोषित करण्यात आला आहे. गेल्या 15 सप्टेंबर रोजी गुजरात राज्यातील गांधीनगर येथे समितीचे अध्यक्ष व बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख नरेंद्र देवरे व सदस्य सचिव रमेश गायकवाड यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. समितीला व विभागीय कार्यालयाला असे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी भाषेला संपर्क भाषा हिंदीची जोड देऊन ग्राहक वाढवून व्यवसाय वृद्धी करावी. सर्व योजनांची माहिती ग्राहकांना त्यांच्या भाषेत दिली जाईल याकडे लक्ष द्यावे, असे यानिमित्ताने सूचित करण्यात आले हा पुरस्कार रत्नागिरी शहरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, विमा कंपनी व बँक यांनी केलेल्या हिंदी भाषेच्या कार्याचा गौरव असल्याचे समिती अध्यक्ष श्री. देवरे यांनी सांगितले. नगर राजभाषा समिती हर घर तिरंगा बाइक रॅली, स्वच्छता अभियान, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण यासारख्या राष्ट्रीय व सामाजिक अभियानात सहभागी असते. क्षेत्रीय मराठी भाषेबरोबरच हिंदीचा प्रयोग केला जातो या कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार मिळाला. समितीचे सदस्य सचिव व बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक, राजभाषा रमेश गायकवाड काम पाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी