मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे. मागील काही वर्षांमध्ये मराठी रंगभूमी पुन्हा बहरू लागली आहे. नवीन नाटकांच्या जोडीला जुनी गाजलेली मराठी नाटके पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. नाट्यगृहांसमोर 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड दिमाखात झळकत असून, बाल्कनीही उघडल्या जात आहेत. यामध्ये नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आलेल्या जुन्या नाटकांचा मोलाचा वाटा आहे. या नाटकांच्या यादीत आता आणखी एका आशयघन नाटकाचे नाव जोडले जाणार आहे. मराठी रसिकांच्या मनात घर केलेले 'शेवग्याच्या शेंगा' हे सदाबहार नाटक नवीन संचात पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे.
देश-विदेशांतील प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी १० एप्रिल २०१५ रोजी सर्वप्रथम 'शेवग्याच्या शेंगा' हे नाटक मराठी रंगभूमीवर आणले होते. त्यात स्वाती चिटणीस आणि संजय मोने यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता १० वर्षांनंतर मिलाप थिएटर्स या रॉमकॉम नाटकाची पुनःनिर्मिती करत आहे. या नाटकाचे लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले असून, त्यांनीच पुन्हा नव्याने नाटक दिग्दर्शितही केले आहे. या नवीन संचातील 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकाची जोरदार तालीम सुरू असुन, २७ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यात नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहे. मुंबईतील प्रयोगही लवकरच प्रेक्षकांसाठी सुरू होणार आहेत. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन रिअल लाईफ जोडी या नाटकात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यांच्या सोबत नंदीता पाटकर, अपूर्वा गोरे, अंकिता दिप्ती, साकार देसाई हे कलाकारही नाटकात आहेत. दिप्ती प्रणव जोशी या नाटकाच्या निर्मात्या असून, राहुल कर्णिक, पुलकेशी जपे, डॉ. मंदार जोशी सहनिर्माते आहेत. अथर्व थिएटर्स चे संतोष भरत काणेकर या नाटकाचे प्रस्तुतकर्ता आहेत. फिक्शन फॉक्स या नाटकाचे जाहीरात संकल्पक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार तन्मय नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. नितीन नेरूरकर यांनी नेपथ्य केले असून, शितल तळपदे यांची प्रकाशयोजना नाटकामध्ये रंजक दृष्यपरिणाम साधते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर