मुंबई, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। संवेदनशील आणि मनाच्या गाभ्याला भिडणाऱ्या कथांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नीरज घायवान यांचा नवा चित्रपट ‘होमबाउंड’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला असून, आता तो भारतीय प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात दाखल होणार आहे.
या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. विशेष म्हणजे, चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी उभे राहून दाद दिली होती. तब्बल ९ मिनिटांचा स्टँडिंग ओवेशन मिळवणं ही कोणत्याही चित्रपटासाठी मोठी उपलब्धी मानली जाते. त्यानंतर या चित्रपटाने टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही आपली छाप सोडली. इतकेच नव्हे तर प्रेक्षकांनी दिलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे चित्रपटाला पीपल्स चॉइस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला असून, त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह उंचावला आहे. ट्रेलरमध्ये ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचं भरभरून कौतुक होत असून, ही कथा भावनांच्या सर्वांत खोल थरांना स्पर्श करणारी असल्याचं प्रेक्षक सांगत आहेत.
पात्रांबाबत बोलायचं झाल्यास, विशाल जेठवा याने चंदन कुमारची भूमिका साकारली आहे, जी संघर्षांनी भरलेली असूनही अत्यंत मानवी आणि वास्तव भासते. ईशान खट्टर याने मोहम्मद शोएब अलीचं पात्र उभं केलं असून, संवेदनशीलता आणि ताकद यांचा अनोखा संगम यात दिसून येतो. तर जान्हवी कपूर सुधा भारतीच्या भूमिकेत झळकत असून, कथा एका नव्या उंचीवर घेऊन जाते. तसेच हर्षिका परमारही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, ज्यामुळे कथानकाला अधिक गती आणि खोली मिळते.
या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन्सने केली असून, २६ सप्टेंबर रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जशी जादू केली, तसाच प्रभाव भारतीय बॉक्स ऑफिसवरही ‘होमबाउंड’ टाकेल अशी अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर