मुंबई, १७ सप्टेंबर, (हि.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित नव्या बायोपिक चित्रपटाचा ‘माँ वंदे’ चा पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उन्नी मुकुंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत एका करारावर स्वाक्षरी करताना दिसत आहेत.
या महत्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांतीकुमार सीएच करत असून, त्यांच्या संवेदनशील दिग्दर्शनशैलीसाठी ते ओळखले जातात. या चित्रपटाची निर्मिती वीर रेड्डी एम यांनी केली आहे. पॅन-इंडिया स्तरावर हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये उन्नी मुकुंदन मोदींच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या गेटअपने आणि गंभीरतेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी मुकुंदन हे मोदींच्या भूमिकेत उत्तम दिसत असल्याचे म्हटले आहे.
‘माँ वंदे’ हा चित्रपट मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांची मांडणी करणार आहे. मोदींसारख्या प्रतिभावान नेत्याची भूमिका साकारताना उन्नी मुकुंदन आपल्या दमदार अभिनयाने आणि अभिव्यक्तीने प्रेक्षकांना भारावून टाकतील, अशी अपेक्षा आहे.
या भूमिकेसाठी मुकुंदन विशेष तयारी करत असून आपल्या देहबोलीवर त्यांनी काम सुरू केले आहे.
हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, मेकर्सनी हा सिनेमा इंग्रजी भाषेत देखील बनवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मोदींची कहाणी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे हा चित्रपट केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर