अकोला, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचे पोस्टर सध्या महाराष्ट्र भर लावले जात आहेत. असेच एक पोस्टर अकोल्यातील जुने बस स्थानक येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ व मुतारीवर लावलेले असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांच्या निर्देशनात आले. मनसे सैनिकांनी तात्काळ बस आगर प्रमुख तसेच महापालिका प्रशासनाला या घटनेची माहिती दिली.
दोन्ही विभागाने ह्या बाबीची जबाबदारी एकमेकांवर ढकलून देत चालढकल करण्याचा प्रयत्न केला.मनसे पदाधिकारी ह्यानी दोन्ही विभागांना धारेवर धरत पोस्टर लावण्याची कोणती परवानगी असल्याची विचारणा केली असता अशी कोणतीच परवानगी दोन्ही विभागाकडून घेण्यात आली नसल्याचे आढळून आले. महापुरुषांचा अपमान व विटंबना मनसे कदापि सहन करणार नसून ज्याने हे पोस्टर अशा अस्वच्छ जागेत लावले. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे सैनिकांकडून करण्यात आली असून सदर पोस्टर काढून टाकण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, शहर अध्यक्ष सौरभ भगत,विभाग अध्यक्ष अमोल भेंडारकर,संतोष बोर्डे,प्रदीप मस्तूद,हर्षल अंभोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे