ढाका, 18 सप्टेंबर (हिं.स.)। बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शेख हसीना यांचे राष्ट्रीय ओळखपत्र (एनआयडी ) “ब्लॉक” केले आहे, ज्यामुळे त्या येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बांगलादेशच्या अपदस्थ पंतप्रधान शेख हसीना यांची आता निवडणूक लढवण्याची आशा धूसर झाली आहे.
निवडणूक आयोगाचे सचिव अख्तर अहमद यांनी ढाक्याच्या निवडणूक भवनात पत्रकारांशी बोलताना सांगितले, “ज्यांचे राष्ट्रीय ओळखपत्र लॉक होते, ते परदेशातून मतदान करू शकत नाहीत.” त्यांनी असेही सांगितले, “त्यांचे (हसीना यांचे) एनआयडी लॉक आहे.” अहमद यांनी इतर कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र, वृत्तपत्रांच्या माहितीनुसार निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हसीना यांची लहान बहीण शेख रेहाना, मुलगा सजीब वाजेद जॉय आणि मुलगी सायमा वाजेद पुतुल यांचे एनआयडी कार्ड्सही “लॉक” किंवा “ब्लॉक” करण्यात आले आहेत. तथापि, या निर्णयानंतर शेख हसीना निवडणूक लढवू शकतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रेहाना यांच्या मुली तुलिप रिजवाना सिद्दीक, अजमीना सिद्दीक, पुतण्या रदवान मुजीब सिद्दीक बॉबी, त्यांच्या नातेवाईकांसह हसीना यांचे माजी सुरक्षा सल्लागार सेवानिवृत्त मेजर जनरल तारीक अहमद सिद्दीक, त्यांची पत्नी शाहीन सिद्दीक आणि मुलगी बुशरा सिद्दीक यांनाही मतदानापासून रोखण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे.
अहमद यांनी सांगितले की, “जे लोक ‘कायद्यापासून वाचण्यासाठी’ किंवा इतर कारणांमुळे परदेशात गेले आहेत, तेव्हाच मतदान करू शकतात जेव्हा त्यांचे राष्ट्रीय ओळखपत्र (एनआयडी) सक्रिय असते.”
शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारला ५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सत्तेवरून हटवण्यात आले. त्या परिस्थितीत हसीना यांना देश सोडून भारतात जावे लागले. त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनुस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आणि अवामी लीगच्या सर्व हालचाली निलंबित केल्या. सध्या हसीना यांच्याविरुद्ध बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अनुपस्थितीत खटला सुरू आहे, जिथे अभियोजकांनी जुलै २०२४ च्या उठावादरम्यान झालेल्या कथित अत्याचारांबाबत त्यांना मृत्युदंड देण्याची विनंती केली आहे.
शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर अवामी लीगचे अनेक वरिष्ठ नेते आता लपून बसलेले आहेत किंवा निर्वासित जीवन जगत आहेत, कारण संतप्त जमावाने त्यांच्या मालमत्तांवर हल्ला करून तोडफोड केली. या मालमत्तांमध्ये बांगलादेशचे संस्थापक व हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचे ढाका येथील ३२ धनमंडी येथील ऐतिहासिक निवासस्थानही समाविष्ट होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode