टोकियो, 18 सप्टेंबर (हिं.स.)। बेकायदेशीर मार्गाने लोकांना परदेशात पाठवणाऱ्या धंद्याशी संबंधित व्यवसायात एका पाकिस्तानी गुन्हेगाराची एक विचित्र युक्ती उघडकीस आली आहे.या व्यक्तीने पाकिस्तानातील २२ लोकांना परदेशात बेकायदेशीर पद्धतीने पाठवण्यासाठी त्यांना फुटबॉल संघाचे खेळाडू दाखवले. त्यानंतर २२ जणांच्या एका गटाला फुटबॉल टीम म्हणून जपानला पाठवण्यात आले.पण जपानच्या विमानतळावरच या सर्वांचा पर्दाफाश झाला. त्यामुळे ही संपूर्ण फसवणूक उघडकीस आली.हा प्रकार क्रीडा क्षेत्राच्या आडून सुरू असलेल्या मानव तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जपानी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर, त्या सर्व लोकांना परत पाकिस्तानला पाठवण्यात आले. यानंतर पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) त्यांना अटक केली. रिपोर्टनुसार, हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर मार्गाने लोकांना परदेशात पाठवण्याशी संबंधित आहे. एफआयए ने याला मानव तस्करीचे मोठे प्रकरण म्हणून ओळखले आहे.
ही फसवणूक पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यातील पसरूरचा रहिवासी मलिक वकास याने केली.वकासने ‘गोल्डन फुटबॉल ट्रायल’ नावाचा बनावट क्लब तयार केला, जो पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनशी संलग्न असल्याचे दाखवले गेले. जपानला गेलेल्या टीमने विदेश मंत्रालयाकडून मिळालेला अनापत्ती प्रमाणपत्र (एनओसी) दाखवले होते.याच कागदपत्रांचा वापर करून टीमने सियालकोट विमानतळावरून जपानकडे उड्डाण केले होते. वकासने त्या लोकांना खेळाडूंसारखे वागण्याचे प्रशिक्षणही दिले होते, जेणेकरून त्यांच्यावर संशय येणार नाही.चौकशीत असेही उघड झाले की, त्याने प्रत्येक व्यक्तीकडून जपानच्या प्रवासासाठी ४० लाख पाकिस्तानी रुपये घेतले होते.
पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, एफआयएच्या गुजरांवाला युनिटने १५ सप्टेंबर रोजी वकासला अटक केली आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले.अटकेनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये वकासने याआधीही १७ लोकांना जपानला पाठवले होते, ज्यात प्रत्येकाने बनावट जपानी क्लब ‘बोविस्टा एफसी’ कडून फसव्या निमंत्रणाच्या आधारे १५ दिवसांचं व्हिसा मिळवलं होतं. या १७ लोकांपैकी एकही जण अद्याप पाकिस्तानमध्ये परत आलेला नाही.
हा प्रकार पाकिस्तानमध्ये बेकायदेशीर मार्गाने लोकांना परदेशात पाठवणाऱ्या नव्या आणि धोकादायक पद्धतीचं उदाहरण मानलं जात आहे, जिथे क्रीडेसारख्या प्रतिष्ठित क्षेत्राचा गैरवापर करून मानव तस्करी केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode