लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। महिला भगिनींचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब व समाज देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे, याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मार्फत स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशभर राबवण्यात येत आहे.
या अनुषंगाने चाकूर तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
अभियानाचे उद्दिष्ट प्रत्येक नारी निरोगी, समर्थ व आत्मनिर्भर होऊन कुटुंब सशक्त व समाज सक्षम करण्याकडे आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील हजारो महिलांना थेट फायदा होणार असून, त्यांना आरोग्यविषयक सेवा सहज उपलब्ध होतील.
अभियान अतंर्गत ग्रामीण व शहरी भागामधील महिला व मुलांसाठी तपासणी व विशेष आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबीरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, तोंड, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी, माता व बाल आरोग्य सेवा, आयुष्य सेवा, क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुली व महिलासाठी अनेमीया तपासणी होणार आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन यानिमित्ताने केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, जिल्हा शैल्य चिकित्सक प्रदीप ठेले, आर.एम.ओ डॉ.अशोक सारडा, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. विवेक खुळे, जितेन जयस्वाल, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंदराव महालिंगे, नितीन रेड्डी, पपन कांबळे, डॉ. एम.जी मिर्झा, रविभाऊ कुलकर्णी, शिवदर्शन स्वामी, रामभाऊ कसबे, भागवत फुले, नरसिंग गोलावार, गंगाधरआप्पा अक्कानरू, सिद्धेश्वर आप्पा अंकलकोटे, गणपत महाराज नितळे, मधुकरराव मुंडे, संदीप शेटे, अनिलराव वाडकर, सर्व डॉक्टर, स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis