रायगड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील महिला क्रिकेट खेळाडूंना पंच म्हणून घडविण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA) तर्फे उरण येथे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
उरणमधील डी.के. भोईर यांच्या माऊली हॉल येथे मंगळवारी हे शिबिर पार पडले. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीसीसीआयचे पंच आणि माजी रणजीपटू हर्षद रावले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत क्रिकेट नियमांचे तज्ञ नयन कट्टा, तसेच एमसीए पॅनलवरील पंच विघ्नहर्ता मुंढे, रोहन पाटील, प्रशांत माळी, व उरण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य केशरीनाथ म्हात्रे यांची उपस्थिती लाभली.
या शिबिराचे आयोजन खासकरून २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या महिलांच्या पंच परीक्षेच्या तयारीसाठी करण्यात आले होते. परीक्षेचे स्वरूप लेखी, तोंडी व प्रत्यक्षिक असे असून, यामार्फत महिला पंचांची निवड केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील श्रुती अडित, अस्मिता गोवारी, साची बेलोसे, गार्गी साळुंखे या महिला खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला.
आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले. तसेच डी.के. भोईर यांनी हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
या उपक्रमासाठी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी परीक्षार्थींना यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके