जळगाव, 18 सप्टेंबर, (हिं.स.) जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे “बेस्ट परेड (मार्च पास)” स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून हा उपक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. “एकता आणि अनुशासन” या एनसीसीच्या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, समन्वय आणि संघभावना वृद्धिंगत करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत महाविद्यालयीन तसेच शालेय पथकांमधील प्रथम क्रमांक विजेत्यांना “जळगाव डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ट्रॉफी” प्रदान करण्यात येणार आहे. राज्यात एनसीसी विद्यार्थ्यांसाठी होणारा हा पहिलाच अभिनव प्रयत्न ठरणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी ही बेस्ट परेड स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाणार असून ही ट्रॉफी फिरती असेल. प्रत्येक वर्षी स्पर्धेचे आयोजन करून त्यामधील विजयी एनसीसी पथकाला “डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ट्रॉफी” प्रदान करण्यात येईल. ऑक्टोबर २०२५ मध्ये जिल्हास्तरावर या स्पर्धेचा पहिला सोहळा पार पडणार असून याचे आयोजन १८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेना, जळगाव यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अधिकृतपणे “बेस्ट मार्चिंग कंटिंजंट – डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ट्रॉफी” जाहीर केली. या प्रसंगी १८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेनेचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अश्विन वैद्य, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ तसेच एनसीसीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर