नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (हिं.स.) : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) 3 जागांवर विजय मिळवून हॅटट्रिक पूर्ण केली आहे. विद्यार्थी संघाच्या 4 पदांसाठी झालेल्या निवडणुकीत एबीव्हीपीने अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव ही 3 पदे जिंकली, तर एकमेव उपाध्यक्ष पद नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) खात्यात गेले.
अध्यक्षपदी अभाविपचे आर्यन मान यांचा विजय झाला आहे. त्यांनी एनएसयूआयच्या जोसलिन नंदिता चौधरी यांना तब्बल 16,196 मतांनी पराभूत केले. तर उपाध्यक्ष पदी एनएसयूआयचे राहुल झांसला यांनी जिंकले असून त्यांनी एबीव्हीपीच्या गोविंद तंवर यांचा पराभव केला. झांसला यांना 29,339 मते मिळाली, तर तंवर यांना 20,547 मते मिळाली.सचिव पदावर अभाविपचे कुणाल चौधरी यांनी 23,779 मते घेऊन एनएसयूआयच्या कबीर यांचा पराभव केला. सहसचिव पदावर अभाविपच्या दीपिका झा यांनी लवकुश भडाना यांचा पराभव करत विजय मिळवला. एनएसयूआयने 2024 मधील निवडणुकीत 7 वर्षांच्या खंडानंतर अध्यक्ष आणि सहसचिव पद जिंकले होते. मात्र, यंदा अभाविपने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करत मोठी घोडदौड केली आहे. दरम्यान स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा) या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांना यंदा कोणताही विजय मिळवता आला नाही.
राजकीय प्रवासाची पहिली पायरी
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघ निवडणुका म्हणजे केवळ विद्यापीठातील सत्ता नसून, देशाच्या भविष्यातील नेतृत्वाचा संकेत मानल्या जातात. या निवडणुकांनी अनेक राष्ट्रीय नेते घडवले असून यामध्ये अरुण जेटली, सुषमा स्वराज, विजय गोयल, अलका लांबा, प्रवेश वर्मा यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री रेखा गुप्ता ह्यांचा राजकीय प्रवास देखील दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघ निवडणुकीपासूनच सुरू झाला होता. दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत ट्विटर संदेशात म्हंटले की, हा विजय राष्ट्र प्रथम या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांची शक्ती दर्शवतो. अभाविपची ही विजययात्रा विद्यार्थ्यांच्या शक्तीला राष्ट्रशक्तीत रूपांतरित करण्यास गती देईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी