- महायुती आघाडीचा यापुढेही भाग राहील
नागपूर, 19 सप्टेंबर (हिं.स.) - पक्ष हा कोणत्याही एका जातीचा - पातीचा नाही हा पक्ष सर्वसामान्य जनतेचा... लोकांचा आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम आपण करतो. आजचा नागरीक आपल्याकडून अपेक्षा करत आहे. जनता संवाद निरंतर सुरू राहिला पाहिजे. जनतेला हेलपाटे मारायला लावू नका. सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वय अधिक घट्ट करूया. जमिनीवर सक्रीय रहा लोकांना भेटा आपले उपक्रम कोणते आहेत याची माहिती दिली पाहिजे, असे आदेशच अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'चिंतन शिबिर'चे उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित होते.
कोणतीही संघटना ही फक्त वरच्या पातळीवरच मजबूत नाही, तर ती तळागाळातून बांधली जाते. प्रत्येक नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे मुद्दे लोकांसमोर ठेवले पाहिजेत. 'चिंतन शिबिर' केवळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती तयार करण्यावरच लक्ष केंद्रित करणार नाही, तर भावी पिढीवरही लक्ष केंद्रित करेल. लोकांना विश्वास देणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्वाचे असून लोकशाही - न्याय - समता या विचारावर आज शिबिर होत आहे. अनेक वर्षे समाजकारण, राजकारण करणारे लोक उपस्थित आहेत. सर्वधर्मसमभाव मानणारा हा पक्ष आहे. शिव - शाहू - फुले- आंबेडकर यांची विचारधारा घेऊन काम करत आहोत, असे विचार पवार यांनी मांडले.
पवार पुढे म्हणाले की, मित्रपक्षांमधील परस्पर आदर आणि राज्याच्या प्रगतीसाठीच्या वचनबद्धतेमुळे आपला पक्ष महायुती आघाडीचा भाग आहे. म्हणूनच राज्याची स्थिरता आणि प्रगतीसाठी आपला पक्ष महायुती आघाडीचा यापुढेही भाग राहील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हे चिंतन शिबीर नेहमीसारखे नसून थोड्या वेगळ्या स्वरूपाचे असणार आहे. यावेळी काही ग्रुप करून त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे चर्चा केली जाणार आहे. तुमच्या मनामध्ये धाडसी कल्पना असू शकतात, त्याचा विचार करण्यात येईल. राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. विदर्भातील काही प्रश्न वेगळे, मराठवाड्यातील वेगळे, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळे तर कोकणमधील वेगळे प्रश्न्त आहेत. असे सगळ्या वेगवेगळा भागात आपल्याला काही ठोस निर्णय घ्यायचे आहेत. कार्यक्रमादरम्यान झालेल्या चर्चा आणि विचारविनिमयानंतर, नागपूर घोषणापत्र म्हणून एक मसुदा तयार करून प्रकाशित केला जाईल. समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ओळख आहे. हे चिंतन शिबीर हे फक्त पालिका निवडणुकींसाठी नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारधारा, भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हे शिबीर आहे.
प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला एक प्रश्न विचारतो की, आज मी किती लोकांच्या आयुष्यात बदल घडवला? हाच माझा यशाचा मापदंड आहे आणि हाच माझ्या राजकारणामध्ये असण्याचा हेतू आहे. सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळेजण काम करत असताना किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले? हे महत्त्वाचे.
पक्षाच्या वतीने बुथ, जनसंवाद, रोजगार शिबिरे घेणार आहोत. त्यावेळी पक्ष लोकांच्या जवळ राहणार आहोत. सत्ता किंवा पदासाठी आम्ही पाऊल उचलले नव्हती तर राज्याची प्रगती व्हावी. ठोस निर्णय घेता यावा या हाकेला ओ दिली आणि आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो.
एक दिवस पक्ष सांगतो त्यावेळी तुम्ही वेळ देऊ शकत नाही. यापुढे जबाबदारी आल्यावर भान ठेवले पाहिजे. मंत्री महोदयांना पक्षापेक्षा काम जास्त असेल तर त्यांनी आपलं पद मोकळं करायला हरकत नाही. पालकमंत्री ज्यांना मिळाले आहे त्यांनी इतर दिवशी जावंच लागेल आणि लोकांची कामे पूर्ण करा. लोकांची कामे होणार नसेल, तर खुर्ची खाली करावी लागेल, हा निर्वाणीचा इशाराही पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी