गायक जुबिन गर्ग यांचे निधन; पंतप्रधानांसह अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर (हि.स.)। आसामचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघाती निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी झालेल्या त्यांच्या अचानक निधनाने संगीतसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ‘गँगस्टर’,
गायक ज़ुबिन गर्ग


नवी दिल्ली, १९ सप्टेंबर (हि.स.)। आसामचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघाती निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी झालेल्या त्यांच्या अचानक निधनाने संगीतसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ‘गँगस्टर’, ‘क्रिश ३’, ‘झूम बराबर झूम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांना त्यांनी आपला आवाज दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले, “लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांच्या अचानक निधनाने मी स्तब्ध झालो आहे. संगीतविश्वातील त्यांचे समृद्ध योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या सादरीकरणांनी सर्व स्तरातील लोकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना.”

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी देशाने एक जादुई आवाज आणि बहुआयामी कलावंत गमावल्याचे सांगितले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जुबिन गर्ग यांना आसामचा आवाज म्हणत त्यांच्या गीतांचे आणि योगदानाचे स्मरण प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होत राहील, असे म्हटले. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हे आसामसह संपूर्ण देशासाठी नुकसान असल्याचे सांगितले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधून जुबिन गर्ग यांचे पार्थिव आसाममध्ये लवकरात लवकर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी जुबिन गर्ग हे फक्त गायक नव्हते तर एक सांस्कृतिक धरोहर होते, त्यांच्या स्वरांनी लोकांना एकत्र आणले, असे नमूद केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या आवाजाने एक पिढी घडवली असून आसामी संगीताला नवे वळण दिले, असे म्हटले. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी त्यांना आसामचे सांस्कृतिक प्रतीक संबोधले आणि त्यांचे संगीत पुढील पिढ्यांना प्रेरित करत राहील, असे सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्सवर लिहिले, “प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार आणि कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे जुबिन गर्ग यांच्या सिंगापूरमधील अपघाती निधनाने मी स्तब्ध झालो आहे. ‘आसामचा आवाज’ म्हणून गौरवले गेलेले गर्ग यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये आपली जादू निर्माण केली आणि अल्पावधीतच सांस्कृतिक आयकॉनचा दर्जा मिळवला. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मी माझ्या गहिर्‍या संवेदना व्यक्त करतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande