अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
विविध कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने त्यासंबंधीचा आकृतीबंध पंधरवड्यात मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
विद्यापीठांत आवश्यक वसतिगृहांसाठी, तसेच पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू व अधिकाऱ्यांची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्यासह विविध विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध विद्यापीठांचे कुलगुरू व अधिकाऱ्यांकडून कृषी मंत्री श्री. भरणे यांनी सर्व विद्यापीठांचे कार्यक्षेत्र, उपक्रम, अडचणी आदींबाबत जाणून घेतले व पदभरती, पायाभूत सुविधा, वसतीगृहाबाबतच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
हवामान बदलाचे जगावर मोठे
संकट आहे. अचानक अतीवृष्टीसारख्या संकटाने शेती व पिकांचे नुकसान होते. हे आपण सर्वांना आव्हान आहे. त्यामुळे बदलत्या स्थितीतील संकटावर मात करून शेती उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग व संशोधन करून कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी मंत्री श्री. भरणे यांनी यावेळी विद्यापीठातील भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती मंदिराला भेट दिली व भाऊसाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. विद्यापीठाच्या उपक्रमाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे