कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’ ची सुविधा वाढवा - मुख्यमंत्री
मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। : नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडण
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’ ची सुविधा वाढवा -	मुख्यमंत्री


मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। : नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची 92 वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. अपर मुख्य सचिव (विमान चालन) संजय सेठी, मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, सिडको चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डीमध्ये विमानांच्या पार्किंगचे दर इतर विमानतळाच्या तुलनेत कमी ठेवण्यात यावेत. शिर्डीचे महत्व आणि आगामी काळात येथे येणाऱ्या भाविकांची वाढणारी संख्या विचारात घेता विमानतळजवळ पंचतारांकित हॉटेलची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी जागा सुनिश्चित करुन नामांकित हॉटेल्स कंपन्यांना येथे निमंत्रित करावे. यवतमाळ येथील विमानतळाची धावपट्टीची लांबी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिली. जेथे खासगी कंपन्या विमानतळ चालवण्यास घेतात तथापि मध्येच ते बंद पडतात, अशा ठिकाणी दंड आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

एमएडीसीच्या उपाध्यक्ष श्रीमती पांडे यांनी यावेळी राज्यातील विविध विमानतळाच्या सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. शिर्डी येथे रन वे आणि टॅक्सी वे च्या पुनर्पृष्ठिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल ब्लॉकचे काम पूर्ण झाले असून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे, ऑक्टोबर 2025 पर्यंत ते प्रत्यक्षात कार्यरत होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या प्रवासी टर्मिनल भवनचे काम सुरू आहे. यासंदर्भातील सविस्तर वास्तू आराखडे अंतिम करण्यात आले असून, ते विविध वैधानिक प्राधिकरणांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर येथे एअर कार्गो कॉम्प्लेक्स उभारणीचा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबरोबरच अमरावती (बेलोरा), पुरंदर, कराड, गडचिरोली, रत्नागिरी आदी ठिकाणच्या विमानतळाच्या विकास आणि विस्ताराबाबत सद्यस्थितीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मिहान मध्ये सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडला 223 एकर जमीन : 12,780 कोटींची गुंतवणूक

सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (एसडीएएल) या देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्प्लोजिव व इनिशिएटिंग सिस्टीम्स उत्पादक व निर्यातदार कंपनीला मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील 223 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. एसडीएएलने डावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनाशी याबाबतचा सामंजस्य करार केला होता. या करारानुसार कंपनी नागपूरमध्ये ‘अँकर मेगा डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्प’ उभारणार असून, यामध्ये 12,780 कोटी रुपयांची गुंतवणूक व सुमारे 6,825 थेट रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे कंपनी 660 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट व डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प उभारणार आहे. यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे 875 रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मिहानमध्ये संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील गुंतवणुकीला नवे बळ मिळून, नागपूर व विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande