नवी दिल्ली , 19 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेने भारतावर लावलेल्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारासंदर्भातील चर्चा पुढे सरकत आहे. यासोबतच सौदी अरेबिया आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या करारावर त्यांनी भारताचं मत मांडलं. रणधीर जायसवाल यांनी सांगितलं की, 16 सप्टेंबर 2025 रोजी अमेरिकेच्या सहाय्यक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी प्रतिनिधीमंडळाने भारताच्या वाणिज्य मंत्रालयात बैठक घेतली. या चर्चांबाबत जायसवाल म्हणाले की, चर्चा सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण झाली असून व्यापार कराराच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देश लवकरात लवकर परस्पर फायद्याच्या व्यापार करारावर पोहोचण्यासाठीच्या प्रयत्नांची तीव्रता वाढवणार आहेत. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या करारावर प्रतिक्रिया देताना जायसवाल म्हणाले की, भारत आणि सौदी अरेबियामध्ये एक व्यापक रणनीतिक भागीदारी आहे, जी गेल्या काही वर्षांमध्ये अधिक मजबूत झाली आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, या भागीदारीमध्ये दोन्ही देशांचे परस्पर हितसंबंध आणि संवेदनशीलता यांचा आदर केला जाईल. याआधी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 17 सप्टेंबर रोजी सांगितले होते की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा योग्य दिशेने प्रगती करत आहे.त्यांनी सांगितले की, दक्षिण आणि मध्य आशियासाठी अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी 16 सप्टेंबर रोजी भारतीय अधिकाऱ्यांबरोबर संपूर्ण दिवस चर्चा केली. या बैठकीनंतर वाणिज्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करत सांगितले की, “परस्पर लाभदायक व्यापार करार लवकरात लवकर अंतिम करण्यासाठी प्रयत्न गतीमान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” सध्या अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावले आहे, त्यामुळे हे चर्चासत्र दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode